जानेवारी संपत आला. पहिल्यांदा गड्डा मिस झाला.
अरे....समजलं नसेल ना मी काय म्हणतोय ते?
मी बोलतोय सोलापुरच्या जत्रेबद्दल, ज्याला सोलापुरातले सगळे गड्डा म्हणतात.
साधारण जानेवारीचा पूर्ण महिना जत्रेची तयारी आणी जत्रेला भेट देण्यातच जातात.
५-६ तारखेपासून गड्ड्याची तयारी सुरू होते. आणी गड्डा सुरू होतो १० तारखेपासून.भोगी,संक्रांतीला जास्त महत्व असायचं जत्रेत. काठ्यांची मिरवणूक, अनवाणी चालून ६८ शिवलिंगांना अभिषेक, सिद्धरामेश्वरांचे काठीसोबत लग्न आणी शेवटी दारूकामाची आतिषबाजी....
बाकी जत्रा म्हणजे अशी काही वेगळी असणारे गावचे रितीरिवाज सोडून. त्यामुळे पाळणे, मौत का कुआ, पन्नालाल गाढवाचा शो,मेरी गो राउंड, आरश्याचे खेळ,गारूडी-मदारी खेळ हे सगळं तर असायचच.
माझा आवडता खेळ होता छर्र्याच्या बंदूकीने फुगे फोडायचा. त्यात सगळे पैसे उडवायचो मी.
थोडं विषय सोडून झालं का? वळतोय हा विषयाकडे..
सगळी लहान पोरं आणी मोठ्यांच गड्ड्याला जायचं मेन आकर्षण असायचे भाग्यश्रीचे बटाटेवडे.
ह्या भाग्यश्रीवाल्याचे एक हॉटेल कम मंगलकार्यालय होते. (यातच आमच्या मायबापांचं लगीन झालेलं)
ह्याचा बारमाही व्यवसाय होता मक्याचा चिवडा विकायचा. आणी सिझनल (गड्ड्यापुरता) बटाटेवड्याचा.
होय बटाटेवडेच..वडापाव नाही. मस्त गोल गरगरीत असे असायचे वडे. २ वडे खाल्ले तर पोरांचं पोट भरायला हवं असे. एकदम खुसखुशीत. आणी सोबत तोंडी लावायला लसूण घातलेली सोलापूरी शेंगादाणा चटणी. एकदम जबदस्त समीकरण होते ते.
वडे हाती यायला कमीत कमी अर्धा तास तरी लायनीत थांबाव लागायचं. पण त्यातही एक वेग़ळी मजा होती.शब्दात बध्द न करता येणारी.
परवा गड्डा आणी भाग्यश्री च्या वड्यांची आठवण झाली, ऑफिसवरून आल्यावर नास्त्याला बटाटेवडे केल्यावर, अनायसे महिनाही जानेवारीच आहे.
त्या परवाच्या (स्वर्गवासी)वड्यांचे काही फोटो.
No comments:
Post a Comment