Friday 15 January, 2010

गल्ला

आनंदयात्रींचा लहानपणावरचा लेख वाचला, आठवण आली गल्ल्याची.

लहानपणी गल्ला हा प्रकार फार म्हणजे अगदी जिवाहून प्रिय. आजकालची पोरं याला पिगीबँक पण म्हणतात ब्बॉ.
पहिला गल्ला बाबांनी घेउन दिला होता बालवाडीत छोट्या गटात असताना. मातीचा होता.

कधी मधी मनात आलं तर आजी(बाबांची आई) आणी आजोबा (आईचे काका) चाराणे -आठाणे-बंदा देत.
जास्त मागे लागलो तर आई एका धपाट्यासोबत दोन रुपयाची नोट देई. एक रुपयाची नोट एवढी आवडायची नाही.
त्याचा बंदा आवडायचा. अजूनही त्या दोन रुपयांच्या नोटेचा ओलसरपणा हाताला जाणवतो.
आता डॉलर कमावतोय पण त्याला त्या दोन रुपड्याच्या नोटेचा फील नाही.

हा पहिला गल्ला फोडला चुलत भावंडासोबत लावलेली पैज हारलो तेंव्हा.
तीन चार वर्षात तीन चारशे जमले होते. पैज सोडून उरलेल्या पैशातून नवा गल्ला आणी एक रॅम्बो चा सेट घेतला.

या वेळेस घेतलेला गल्ला होता प्लास्टीकचा. खालून उघडता येणारा. फोडायची गरजच नव्हती.
पण यामुळे एक फायदाही झाला.आईची नजर चुकवून बाहेरचं काहीही खायचं असलं की गल्याची दारं माझ्यासाठी सताड उघडी राहत.ह्यातले काही बंदे मी कधीच वापरले नाहीत. एक होता १९६० चा गांधीजींचा छाप असलेला चांदीचा दहा रुपयाचा बंदा जो माझ्या आजोबांनी बाबांना आणी आता बाबांनी मला दिला होता.

माझ्याप्रमाणे आजीचाही एक गल्ला होता.देवाचा गल्ला. कधी आरतीत जमा झालेले पैशे अधिक दिवसाचे एक-दोन रुपये आजी त्या गल्ल्यात टाकत असे.
बरचसे पैसे जमा झाले की देवासाठी त्यातून चांदीचं निरांजन, प्रसादाच्या वाट्या असं काहीतरी घरात दिसे.
ह्यातले पैसे जमीनीवर ओतून ते मोजत बसणे हा माझा आवडता छंद होता तेंव्हा.
घरातल्यांना तर नक्की वाटलं असेल की मोठा होऊन मी कोणत्यातरी बँकेत कॅशियरचे काम करणार म्हणून.

प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यावर गल्याचं भूत डोक्यावरून थोडं थोडं कमी व्हायला चालू झालं.
गल्ला जाऊन प्यांटीच्या मागच्या खिशात पाकीट आलं. पॉकेटमनी चालू झाला नं.

कॉलेजमधली आपली गर्लफ्रेंड (मैत्रीणी बर्‍याच असतात हो) कॉलेजनंतर एक दोन वर्षाने भेटावी.

आपण तिला आणी तिनेही आपल्याला भाव द्यावा अशी माझी आणी माझ्या गल्ल्याची स्थिती झाली बारावी पास होऊन इंजीनियरींगला प्रवेश घेतल्यावर.

शिकायला आलो पुण्याला. दोन तीन महिन्याने घरी जाण्यासाठी पैसेच उरलेले नसायचे.
कधी जाणार वगैरे काहीच ठरलेले नसे.गल्ला परत चालू केला सेविंगसाठी. दोन एक महिन्याकाठी शे-दोनशे सुटायचे.
हे वाचलेले शे दोनशे प्रवासाच्या कामी येत. पुढे सवय लागून जास्त पैसे वाचले की रूम पार्टनरला महिन्याला शंभर उधारीवर देऊ लागलो.
पुढे त्यालाही सवय झाली की मला न सांगता तो गल्यातून पैसे घ्यायचा आणी महिन्याभराने स्वतः परत करायचा.

शिक्षण पुर्ण झाले आणी नोकरीला लागलो. आजही मी माझा गल्ला सुरुच ठेवलाय.
रोज ऑफिसवरून आल्यावर पाकिटातले सगळे सुट्टे टाकतो त्यात.

No comments:

Post a Comment