रामराम मंडळी,
परवा मित्राकडे गेलो होतो. शनिवारी क्रिकेट खेळून आणी दंगा घालून झाल्यावर रविवारी चिकन बनवायचं ठरवलं. मी तंदूर तर मित्र रस्सा बनवणार. हे आपलं ब्याचलरी (अनिवासी) घरात असणारं साहित्य घेऊन बनवलं आहे बरंका. :)
नुसतं तंदूर खाणार असाल तर हे खालचं साहित्य एका माणसासाठी....रस्स्यासोबत तोंडी लावायला घेणार असाल तर दोघांसाठी ;)
साहित्य :
१. ७-८ चिकन ड्रमस्टीक्स/विंग्स
२. २ चमचे मीठ
३. १-२ चमचे तिखट
४. १ चमचा काळीमिरी पूड
५. १-२ चमचे तंदूर मसाला/चिकन मसाला
६. २ चमचे आलं-लसूण पेस्ट
७. ४ चमचे दही
८. १ चमचा बटर/लोणी/तूप
कृती:
१. चिकन धुऊन , तसेच स्कीन नको असल्यास स्कीन काढून घ्या.
२. एका भांड्यात दही, आलं-लसूण पेस्ट्,तंदूर मसाला, काळीमिरी पूड,मीठ, तिखट एकत्र करून घ्या.
३. ह्यात चिकन घोसळून मॅरिनेट करा.
४. भांड्यावर झाकण ठेवून रात्रभर फ्रीज मधे ठेवा.
५. दुसर्या दिवशी दुपारी तंदूर करायच्या आधी अर्धा तास आधी फ्रीज बाहेर काढून चिकन रूम टेंपरेचरला आणा.
६. ओव्हन मधे अॅल्युमिनियम चा पत्रा (फॉईल) पसरून घ्या.
७. ओव्हन ४०० F/२००C प्रिहीट करून घ्या.
८. फॉईल वर चिकन पसरून ३० मिनीटे बेक करा.
९. ३० मि. नंतर चिकन वर बटर लाऊन १० मिनीटे बेक करा.
१०. १० मि. नंतर चिकन पलटून दुसरी बाजू १५ मिनीटे बेक करा.
तयार आहे चिकन तंदूरी...
No comments:
Post a Comment